नवी दिल्ली - केंद्र सरकारने आर्थिक सुधारणा जाहीर करूनही वाहन उद्योगांवरील मंदीचे सावट कायम आहे. सप्टेंबरमध्ये सलग ११ व्या महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट झाली आहे. चालू वर्षातील सप्टेंबरमध्ये २ लाख २३ हजार ३१७ वाहनांची विक्री झाली. गतवर्षी सप्टेंबरमध्ये २ लाख ९२ हजार ६६० वाहनांची विक्री झाली होती.
सप्टेंबरमध्ये गतवर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत देशातील चारचाकींच्या विक्रीत ३३.४ टक्के घट झाली आहे. चालू वर्षात सप्टेंबरमध्ये १ लाख ३१ हजार २८१ चारचाकींची विक्री झाली. तर गतवर्षी सप्टेंबरमध्ये १ लाख ९७ हजार १२४ चारचाकींची विक्री झाली होती. ही आकडेवारी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमाबाईल मॅन्युफॅक्चुअर्सने (एसआयएएम) आज जाहीर केली आहे.
वाहनाचा प्रकार | विक्रीचे वर्ष सप्टेंबर-२०१८ | विक्रीचे वर्ष सप्टेंबर २०१९ | विक्रीत झालेली घट |
चारचाकी | १,९७,१२४ | १,३१,२८४ | ३३.४० |
प्रवासी वाहन | २,९२,६६० | २,२३,३१७ | २३.६९ |
मोटारसायकल | १३,६०,४१५ | १०,४३,६२४ | २३.२९ |
दुचाकी | २१,२६,४४५ | १६,५६,७७७ | २२.०९ |
व्यवसायिक वाहन | ९५,८७० | ५८,४१९ | ३९.०६ |
गेल्या महिन्यात मोटरसायकलच्या विक्रीत २३.३९ टक्के घट झाली. गतवर्षी सप्टेंबरमध्ये १३ लाख ६० हजार ४१५ मोटरसायकलींची तर चालू वर्षात सप्टेंबरमध्ये १० लाख ४३ हजार ६२४ मोटरसायकलींची विक्री झाली. सप्टेंबरमध्ये गतवर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत एकूण दुचाकींच्या विक्रीत २२.०९ टक्के घट झाली आहे. व्यवसायिक वाहनांच्या विक्रीतदेखील ३९.०६ टक्के घट झाली आहे.