बंगळुरू- इन्फोसिसमध्ये अनुचित प्रकार घडल्याचा दावा कंपनीमधील आणखी (व्हिसलब्लोअर) एका जागल्याने केला आहे. इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी पारेख यांनी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला, असा जागल्याने दावा केला. कंपनीचे चेअरमन आणि संचालक मंडळाला तक्रारीवर जुजबी कारवाई करण्याची पारिख यांनी विनंती केल्याचा जागल्याने आरोप केला आहे.
जागल्याने इन्फोसिसच्या वित्त विभागात काम करत असल्याचा दावा केला आहे. जर ओळख उघड केली, तर आपल्याविरोधात पारेख प्रत्युत्तर म्हणून कारवाई करतील, अशी या जागल्याने भीती व्यक्त केली.
हेही वाचा-' देशाची अर्थव्यवस्था येत्या १० ते १५ वर्षात १० लाख कोटी डॉलरची होईल'
जागल्याने काय म्हटले आहे पत्रात ?
पारेख हे कंपनीत रुजू होवून १ वर्षे आणि ८ महिने झाले आहेत. तरीही ते कंपनीचे संचालन मुंबईमधून करत आहेत. कंपनीचा सीईओ हा बंगळुरूमध्ये असावा, मुंबईमध्ये नको, अशी कंपनीची अट आहे. तरी संचालक मंडळ कशामुळे पारेख यांना बंगळुरूमध्ये आणत नाही ? हे पत्र जागल्याने कंपनीचे चेअरमन तथा सहसंस्थापक नंदन निलकेणी आणि संचालक मंडळाच्या स्वतंत्र संचालकांना लिहिले आहे.