नवी दिल्ली - दुधाच्या भुकटीच्या आयातीवरील शुल्क माफ करण्याच्या प्रस्तावाला अमूलने विरोध केला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास दूध उत्पादकांचे नुकसान होईल, असे अमूलने केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (जीसीएमएमफ) ही अमूल ब्रँडच्या नावाने दूध व दुग्धजन्य पदार्थांची बाजारात विक्री करते. या संस्थेने दुधाची भुकटीवरील आयात शुल्क माफ करण्याच्या सीआयआयच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. भारतीय उद्योग महासंघाने (सीआआय) दुधाच्या भुकटीवरील शुल्क माफ करण्याचा सरकारला केलेला प्रस्ताव हा आश्चर्यकारक आहे. हा प्रस्ताव ५० हजार टन एवढ्या प्रचंड भुकटीसाठी असल्याचे अमुलचे व्यवस्थापकीय संचालक एस. आर. सोधी यांनी अन्नप्रक्रिया मंत्रालयाचे सचिव पुषा सुब्रमण्यम यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.