नवी दिल्ली -आगामी सणाच्या निमित्ताने ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने देशभरात तयारी सुरू केली आहे. यामधून चालू वर्षात 1 लाख हंगामी नोकऱ्यांच्या संधी तयार झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.
सणानिमित्त अनेक कंपन्यांकडून ऑनलाइन खरेदीचे प्रमाण वाढते. ग्राहकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी घरपोच डिलिव्हरी आणि ग्राहकांशी संपर्क करणाऱ्या यंत्रणेची ई-कॉमर्स कंपन्यांना गरज लागते. त्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांकडून हजारो लोकांना हंगामी नोकऱ्या दिल्या जातात.
सणानिमित्त नवीन हंगामी कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. त्यामुळे घरपोच वस्तू देण्याला वेग येणार असल्याचे अॅमेझॉन कंपनीने म्हटले आहे. कंपनीने त्यांच्या भागीदार नेटवर्कमधून हजारो जणांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळवून दिला आहे. या ट्रक वाहतूक, पॅकिंग करणारे आदींचा समावेश आहे. याशिवाय सफाई कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. अॅमेझॉन कंपनीने मे महिन्यात 70 हजार हंगामी कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देणार असल्याचे जाहीर केले होते. कंपनीकडून 2025पर्यंत 10 लाख नवीन नोकऱ्या देणार आहे. त्यासाठी तंत्रज्ञान, पायाभूत आणि लॉजिस्टिक्स नेटवर्कमध्ये कंपनी गुंतवणूक करणार आहे.
अॅमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्टकडून गतवर्षी 1.4 लाख हंगामी नोकऱ्या देण्यात आल्या होत्या. दरम्यान, रेडसीरच्या अंदाजानुसार ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिक्स कंपन्यांमधून चालू वर्षात तीन लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत.