नवी दिल्ली- पंजाब नॅशनल बँकेची भूषण पॉवर आणि स्टील कंपनीने कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता या कंपनीने अलाहाबाद बँकेची १ हजार ७७५ कोटींची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
भूषण पॉवर आणि स्टील कंपनीने फसवणूक केल्याची माहिती अलाहाबाद बँकेने शेअर बाजाराला दिली आहे. तसेच फसवणूक झाल्याची माहिती देणारा अहवाल बँकेने भारतीय रिझर्व्ह बँकेला दिला आहे. फॉरेन्सिक लेखापरीक्षण, तपास तसेच सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर भूषण पॉवर आणि स्टील कंपनीने फसवणूक केल्याचे आढळून आले. ही फसवणूक १ हजार ७७४.८२ कोटींची आहे. सध्या राष्ट्रीय कंपनी लवाद प्राधिकरणाकडे भूषण पॉवर आणि स्टील कंपनीचे कर्ज प्रकरण आहे. यामधून बँकेला चांगली वसुली होईल अशी अपेक्षा आहे.