नवी दिल्ली- एअर इंडियाच्या वैमानिकांनी थकित पगाराबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदिप पुरी सिंग यांना पत्र लिहिले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी (बुधवारी) विमान दुरुस्ती अभियंत्यांनी (एमईएस) राजीनामे दिले आहेत. एअर इंडियाचे भविष्य अनिश्चित असल्याने अभियंत्यांनी राजीनामे दिले आहेत.
राजीनामे देणाऱ्या अभियंत्यांनी प्रशिक्षणाची रक्कम परत करावी, असे एअर इंडियाने आदेश दिले आहेत. या पत्रात म्हटले, की एअर इंडिया अभियांत्रिकी सेवा (एआयइएसएल) आणि एअरक्राफ्ट मेटेन्स इंजिनिअर्स (एएमईएस) या पदासाठी प्रशिक्षण देण्यात आले होते. मात्र, अभियंत्यांनी करार पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामे दिले आहेत. अशा सर्व अभियंत्यांनी प्रशिक्षणाची रक्कम परत करावी, असे एअर इंडियाने आदेशात म्हटले आहे. या रकमेमध्ये टीएसह डीए व हॉ़टेल खर्च याचाही समावेश आहे. जर कोणी ही रक्कम भरण्यात असमर्थ ठरल्यास त्याच्याकडून रक्कम वसूल करण्यात येईल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
संबंधित बातमी वाचा-एअर इंडिया घेणार २ हजार ४०० कोटींचे कर्ज; सरकारकडून मागितली हमी
हे पत्र एअर इंडियाच्या कार्यकारी संचालकांनी जारी केले आहे. किती अभियंत्यांनी राजीनामे दिले आहेत, हे एअर इंडियाने अद्याप स्पष्ट केले नाही. पुढील निर्णय घेण्यासाठी अभियंत्यांची बैठक बोलाविली असल्याचे एका अभियंत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.