नवी दिल्ली -भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, रिलायन्स जिओ ने 19.3 एमबी प्रति सेंकद हा डाऊनलोड वेग ठेवत सर्वात वेगवान मोबाईल नेटवर्क म्हणून आपले स्थान अबाधित ठेवले आहे. तर व्होडाफोनने सप्टेंबर महिन्यात अपलोड वेगात सर्वात उच्च वेगाचा विक्रम नोंदवला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ट्रायने 10 ऑक्टोबरला नवीन आकडेवारी जाहीर केली. त्यात जियो पाठोपाठ आयडिया सेल्युलर नेटवर्कचा (आताचे व्होडाफोन-आयडिया) डाऊनलोड स्पीड 8.6 एमबी प्रति सेकंद इतका आहे. तर वोडाफोन 7.9 एमबी प्रति सेकंद आणि भारती एअरटेल 7.5 एमबी प्रति सेकंद इतका आहे.
व्होडाफोन आणि आयडियाने त्यांचे मोबाइल व्यवसाय विलीन केले असले तरी, ट्रायने त्यांची कामगिरी स्वतंत्रपणे मोजली कारण सध्या दोन्ही कंपन्यांचे नेटवर्क एकत्रिकरण सुरू आहे. 49 शहरांमधील हा अभ्यास केल्यानंतर हा अहवाल आला आहे. खासगी कंपनी ओपनसिग्नल यांनी सप्टेंबर महिन्यात भारती एअरटेलला भारतात सर्वात वेगवान डाऊनलोड गती असल्याचे जाहीर केले होते. तर ट्रायने वास्तविकतेच्या आधारावर मायस्पीड अर्जाच्या मदतीने पॅन-इंडिया स्तरावर गोळा केलेल्या डेटामधून मोजली जाणारी सरासरी नेटवर्क गती मोजली.