मुंबई- जगातील सर्वात परवडणाऱ्या दरातील 4जी फोन असलेला जिओफोन नेक्स्ट हा 10 सप्टेंबरला लाँच होणार आहे. ही माहिती रिलायन्स इंडस्ट्रीज लि. (आरआयएल) कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत (एजीएम) दिली आहे. या स्मार्टफोनसाठी रिलायन्स जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानासाठी गुगलबरोबर भागीदारी करणार आहे.
जिओफोन पुढील गणेश चतुर्थीला म्हणजे 10 सप्टेंबरला लाँच होणार आहे. गतवर्षी गुगलने रिलायन्स इंडस्ट्रीजचे 7.7 टक्के शेअर खरेदी करून 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. गुगलकडून रिलायन्सला तांत्रिक सहकार्याबरोबरच परवडणाऱ्या दरातील स्मार्टफोन विकसित करण्यासाठी मदत केली जाणार आहे.
हेही वाचा-कोव्हॅक्सिनची लस ७७.८ टक्के लस कार्यक्षम; तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष
गुगल आणि जिओ हे अँड्राईवर चालणाऱ्या स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करत असल्याचे अंबानी यांनी मागील वार्षिक सर्वसाधारण बैठकीत सांगितले होते.
हेही वाचा-हिरो मोटोकॉर्पच्या मोटारसायकलींसह स्कूटर १ जुलैपासून महागणार
रिलायन्स जिओ लवकरच 5Gस्मार्टफोनबाजारात आणणार
रिलायन्स जिओ लवकरच आपला 5G स्मार्टफोन बाजारात आणत असून तो 5000 रुपयांपेक्षा कमी किमतीत असेल. जवळपास 20 ते 25 कोटी मोबाईल विक्रीचे लक्ष्य कंपनीने निर्धारित केले आहे. प्रामुख्याने जे सध्या 2G फोनचा वापर करत आहेत त्यांना हा फोन विकण्याचा कंपनीचा मानस आहे.
जिओ पाच हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत फोन लाँच करणार आहे. लाँच केल्यानंतर जेव्हा फोनची विक्री वाढेल, तेव्हा जिओ या फोनची किंमत 2500 ते 5000 रुपये करू शकते. रिलायन्सच्या 43 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स चेअरमन मुकेश अंबानी यांनी भारत 2G मुक्त करण्याची आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत 5G फोन विकण्याची इच्छा व्यक्त केली. सध्या भारतात 27,000 रुपये किमतीमध्ये 5G फोन उपलब्ध आहेत. जिओ अशी पहिली कंपनी आहे की, जिने यापूर्वीही कमी किमतीत 4G फोन विकले होते. ज्यात कंपनीने या फोनसाठी ग्राहकांकडून 1500 रुपये परत करण्याची ग्वाही दिली होती.