मुंबई- कोट्यवधींचे कर्ज थकविणाऱ्या अनिल अंबानी यांच्यावर येस बँकेने मोठी कारवाई केली आहे. बँकेने सांताक्रुजमधील अनिल अंबानी ग्रुपच्या मालकीचे मुख्यालयावर जप्ती आणली आहे. अनिल अंबानी ग्रुपने येस बँकेचे 2 हजार 892 कोटी रुपये थकविले आहेत.
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने कर्ज थकविल्याने येस बँकेने कंपनीच्या मुख्यालयासह दक्षिण मुंबईमधील दोन फ्लॅट ताब्यात घेतले आहेत. ही माहिती येस बँकेने बुधवारी वर्तमानपत्रात जाहीर केलेल्या नोटीसमध्ये दिली आहे. अनिल धिरुभाई कंपनी ग्रुपच्या सर्व कंपन्यांचे काम सांताक्रुझ येथील मुख्यालय असलेल्या कार्यालयामधून काम चालते. हे कार्यालय रिलायन्स सेंटर नावाने ओळखले जाते.
येस बँकेने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे 6 मे रोजीप्रमाणे 2 हजार 892.44 कोटी रुपये थकित असल्याचे म्हटले आहे. कंपनीला कर्ज फेडण्याची 60 दिवसांची नोटीस देवूनही थकित पैसे भरले नाहीत. त्यानंतर येस बँकेने 22 जुलैला रिलायन्स इन्फ्राच्या तीन मालमत्ता ताब्यात घेतल्या आहेत. या मालमत्तेशी कोणताही आर्थिक व्यवहार करू नये, असे येस बँकेने म्हटले आहे. ही मालमत्ता कर्जवसुलीशी संबंधित असल्याचे येस बँकेने म्हटले आहे.