महाराष्ट्र

maharashtra

केंद्राच्या निर्देशानंतर व्हॉट्सअपने गोपनीयतेच्या धोरणात केला 'हा' बदल

By

Published : May 24, 2021, 10:51 PM IST

जे वापरकर्ते गोपनीयतेचे धोरण स्वीकारणार नाहीत, त्यांच्यासाठी सेवा मर्यादीत करण्याचा निर्णय काही आठवड्यापुरता लागू होणार आहे. त्याऐवजी अशा वापरकर्त्यांना गोपनीयतेचे धोरण अपडेट करण्यासाठी आठवण करून दिली जाणार आहे.

व्हॉट्सअप
व्हॉट्सअप

नवी दिल्ली - व्हॉट्सअपने नवीन गोपनीयता धोरण न स्वीकारणाऱ्या वापरकर्त्यांचे सेवा मर्यादित करण्याचा निर्णय काही काळापुरता मागे घेतला आहे. मात्र, वापरकर्त्याला नवीन गोपनीयतेचे धोरण स्वीकारण्यासाठी आणि अपडेटसाठी आठवण करून दिली जाईल, असे व्हॉट्सअपने म्हटले आहे. नवीन डाटा संरक्षण कायदा अस्तित्वात येईपर्यंत ही भूमिका राहणार असल्याचेही व्हॉट्सअपने म्हटले आहे.

केंद्र सरकारने नवीन गोपनीयतेचे धोरण मागे घेण्याचे व्हॉट्सअपला निर्देश दिल्यानंतर कंपनीने भूमिका बदलली आहे. व्हॉट्सअपच्या प्रवक्त्याने म्हटले, की कंपनीने सरकारला प्रतिसाद देत पत्र पाठविले आहे. वापरकर्त्यांची गोपनीयता याला सर्वोच्च प्राधान्य राहिल, असे सरकारला आश्वासन दिले आहे.

हेही वाचा-धडकी भरविणारा अपघात! चेकपोस्ट टाळण्यासाठी पळवली दुचाकी; एकाचा जागीच मृत्यू

वैयक्तिक संदेशाची गोपनीयता अबाधित राहत असल्याचा दावा

जे वापरकर्ते गोपनीयतेचे धोरण स्वीकारणार नाहीत, त्यांच्यासाठी सेवा मर्यादीत करण्याचा निर्णय काही आठवड्यापुरता लागू होणार आहे. त्याऐवजी अशा वापरकर्त्यांना गोपनीयतेचे धोरण अपडेट करण्यासाठी आठवण करून दिली जाणार आहे. या दृष्टीकोनाने सर्व वापरकर्त्यांना बिझनेससाठी कसा संवाद ठेवायचा आहे, हे ठरविता येईल. गोपनीयतेच्या अपडेटमुळे लोकांच्या वैयक्तिक संदेशाच्या गोपनीयतेवर परिणाम होणार नसल्याचा व्हॉट्सअपच्या प्रवक्त्याने पुनरुच्चार केला.

हेही वाचा-...तर देशातील ९ लाख औषध विक्रेते, वितरक जाणार बेमुदत संपावर

काय म्हटले होते केंद्र सरकारने?

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने फेसबुककडे मालकी असलेल्या व्हॉट्सअपला नवीन गोपनीयता धोरण मागे घेण्याचे निर्देश दिले आहे. या गोपनीयतेच्या धोरणाने गोपनीयता, डाटा सुरक्षा आणि भारतीय नागरिकांच्या अधिकाराला हानी पोहोचत असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

काय आहे व्हॉट्सअपच्या अपडेटचा वादग्रस्त मुद्दा?

केंद्र सरकारने व्हॉट्सअपला गोपनीयतेचे धोरण मागे घेण्याची सूचना केल्यानंतर कंपनीने भूमिका स्पष्ट केली होती. प्रस्तावित गोपनीयेतच्या धोरणातून वापरकर्त्यांचा डाटा फेसबुकशी वापर करण्याबाबत कोणताही बदल होणार नाही. त्या मुद्द्याबाबत असलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी खुले असल्याचे कंपनीने म्हटले होते. व्हाट्सअपकडून डाटावर कशी प्रक्रिया केली जाते. डाटा कसा स्टोअर केला जातो, आदी बाबीबाबत धोरण बदलण्यात येत आहे. हे अपडेट ८ फेब्रुवारीपासून लागू होणार होते. मात्र, हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. फेसबुकच्या अटी मान्य केल्यानंतर हे अपडेट होणार आहे.

व्हॉट्सअपने गोपनीयतेच्या धोरणात बदल करण्याचे जाहीर केल्यावर भारतासह जगभरातून फेसबुक कंपनीवर टीका करण्यात आली होती. व्हॉट्सअपचा डाटा फेसबुकची मालकी असलेल्या इतर कंपन्यांकडे सामाई केला जाईल, अशी जगभरातील वापरकर्त्यांमध्ये भीती आहे. असे असले तरी व्हॉट्सअपवरील संदेश हे इन्ड-टू-इन्ड इन्क्रिप्टेड असल्याचे व्हॉट्सअपची मालकी असलेल्या फेसबुकने जाहीर केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details