हैदराबाद– कोरोनाच्या संकटात देशात सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) विमाधारकांना दिला आहे. एलआयसीने बंद पडलेल्या विमा योजनेचे नुतनीकरण करण्यासाठी दोन महिन्यांची विशेष मोहीम सुरू केली आहे.
एलआयसीने रद्द झालेल्या विमा योजनांचे नुतनीकरण करण्यासाठी 10 ऑगस्ट ते 9 ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम सुरू केली आहे. यामध्ये ग्राहकांना रद्द झालेल्या विमा योजनांचे नुतनीकरण करता येणार आहे.
सध्याच्या परिस्थितीत केवळ उशिराचे दंड शुल्क आकारुन विमा योजनेचे नुतनीकरण करून देण्यात येणार आहे. काही पात्र असलेल्या विमा योजनांचे पाच वर्षात नुतनीकरण करता येणे शक्य आहे. त्यासाठी शेवटी भरण्यात आलेल्या विमा हप्त्याच्या दिनांकापासून पुढील पाच वर्षे गृहीत धरण्यात येतात. विमाधारकांना दंडाची रक्कम 20 टक्क्यांनी कमी करण्यात येणार आहे.
पॉलिसी एक्स या वेबसाईटचे सीईओ आणि संस्थापक नवल गोएल म्हणाले, की ज्या ग्राहकांनी 1 जानेवारी 2015 नंतर विमा योजना घेतली आहे, त्यांना बंद पडलेली विमा योजना सुरू करता येणार आहे. कोरोना महामारीत ग्राहकांना वेळेत हप्ता भरण्यात अडचणी येत आहे. अशावेळी ग्राहकांना विमा हप्ता भरणे सोपे व्हावे व उत्पन्नात वाढ होण्यासाठी एलआयसी प्रयत्न करत आहे.
जर तुम्हाला बंद पडलेली विमा योजना सुरू करायची असेल, तर जाणून घ्या सविस्तर माहिती
विमा योजना बंद पडली असल्याचे कधी मानण्यात येते?
जर विमाधारक दिलेल्या वेळेत हप्ता भरू शकला नाही तर त्यासाठी वाढीव कालावधी देण्यात येतो. त्या कालावधीतही विमा हप्ता भरण्यात आला नाही, तर विमा योजना बंद पडते. त्यामुळे ग्राहकाला मिळणारे विमा संरक्षणही बंद पडते.
एलआयली विमा योजनेला वाढीव कालावधी (ग्रेस पिरियड) काय असतो?
विमा हप्ता शेवटच्या तारखेपर्यंतही भरला नाही तर वाढीव कालावधी देण्यात येतो. त्यामध्ये काही दंड आकारून विमा हप्ता भरण्यात येतो. जर वाढीव कालावधीनंतरही विमा हप्ता भरला नाही तर विमा योजना बंद पडते.
एलआयसीकडून विमा हप्ता भरण्याच्या शेवटच्या तारखेपासून 15 दिवसांचा वाढीव कालावधी देण्यात येतो. तर तीन महिन्यांनी, सहा महिन्यांना अथवा एका वर्षाने हप्ता भरणाऱ्या ग्राहकांना 30 दिवसांची वाढीव मुदत देण्यात येते.