पुणे- राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असताना साखर कारखान्यांनी ऑक्सिजनची निर्मिती करावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. सध्या राज्यात कोरोनाबाधितांना उपचार करताना ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती करण्याचे आवाहन केल्याचे पत्र पाठविल्याचे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक शिवाजीराव देशमुख यांनी सांगितले. या पत्रात राज्यातील रुग्णालयांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्याची स्थिती पाहता ऊसाचा गाळप हंगाम सुरू असलेल्या कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती करावी, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आवाहन केले आहे.
हेही वाचा-ऑक्सिजन प्लांटमध्ये 'अशी' घेतात काळजी
काय म्हटले आहे पत्रात ?
ऑक्सिजन निर्मितीसाठी वाफ आणि उर्जेची गरज असते. या दोन्ही गोष्टी साखर कारखान्यात उपलब्ध असतात. कोरोनाबाधितांसाठी ऑक्सिजनची गरज असताना साखर कारखान्यांनी पुढे येण्याची गरज शरद पवार यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. कारखान्यांनी त्यांच्याकडील स्त्रोत, मनुष्यबळ आणि गरज असेल तर भांडवल यांचा वापर करून ऑक्सिजनची निर्मिती करावी, असे पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा-एअरफोर्स महाराष्ट्राच्या मदतीला : ऑक्सिजनच्या रिकाम्या टँकरची करणार वाहतूक
प्रत्यक्षात ऑक्सिजन निर्मितीसाठी चार ते पाच महिने लागणार
राज्य सहकार विभागातील अधिकाऱ्याने ऑक्सिजन निर्मितीसाठी साखर कारखान्यांना गुंतवणूक करावी लागेल, असे म्हटले आहे. तर प्रत्यक्षात ऑक्सिजन निर्मितीसाठी चार ते पाच महिने लागणार असल्याचेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
दरम्यान, देशात गेली दोन दिवस रोज 3 लाखांहून कोरोनाबाधितांचे प्रमाण आढळत आहे. त्यामुळे महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक राज्यांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे.