नवी दिल्ली - टेलिकॉम कंपनी असलेल्या व्होडाफोनचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक रीड यांनी शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासह व्होडाफोन-आयडियाचे एमडी रविंद्र टक्कर हेदेखील उपस्थित होते.
यासोबतच आज रीड हे टेलिकॉम मंत्री रवी शंकर प्रसाद यांचीही भेट घेणार आहेत. १७ मार्चला सर्वोच्च न्यायालयात एजीआर प्रकरणाची अंतिम सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर रीड सध्या भारतात आहेत.
व्होडाफोन आयडिया लिमिटेडची एजीआर थकबाकी ही साधारणपणे ५३ हजार कोटी रुपये आहे. यापैकी ३,५०० कोटी रूपये त्यांनी मागच्या महिन्यात जमा केली आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर टेलिकॉम विभागाने सर्व टेलिकॉम कंपन्यांना आपापली उर्वरीत थकबाकी जमा करण्याची मागणी करणारे पत्र लिहिले होते. यावर व्होडाफोन-आयडिया लिमिटेडने उत्तर देत म्हटले होते, की आपल्याला मदत मिळाल्याशिवाय दिलेल्या मुदतीमध्ये आपण थकबाकी जमा करू शकणार नाही.
आपली एजीआर थकबाकी भरण्यासाठी, मोबाईल डेटा टॅरिफ दरांमध्ये, आणि कॉल चार्जेसमध्ये ६ पैसे प्रतिमिनिटांपर्यंत वाढ करण्यासाठी कंपनीने ट्राय (टीआरएआय) ला परवानगी मागितली होती.