मुंबई- एका छताखाली मुंबई महानगर प्रदेशातील मालमत्तेचे विविध पर्याय इच्छुक घर खरेदीदारांना उपलब्ध व्हावेत यासाठी बांधकाम क्षेत्रातील विविध संघटनाकडून मालमत्ता प्रदर्शन भरविले जातात. पण कोरोनाने या प्रदर्शनांना ब्रेक लागला आहे. असे असताना एमसीएचआय-क्रेडाईने मात्र यावर व्हर्च्युअल रिअल इस्टेट एक्स्पो अर्थात ऑनलाइन मालमत्ता प्रदर्शनाचा मार्ग शोधून काढला आहे. देशातील पहिले असे ऑनलाइन मालमत्ता प्रदर्शन एमसीएचआय-क्रेडाईने उद्यापासून 14 डिसेंबरपर्यंत भरविणार आहे.
ग्राहकांना घर खरेदी करायचे म्हणजे ब्रोकर, दलालाला गाठा, नाही तर त्यांची कार्यालये शोधत फिरा अशा गोष्टींना गेल्या काही वर्षांत छेद जाताना दिसत आहे. कारण आज थेट बिल्डरांकडून घरखरेदी करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यातीलच एक पर्याय म्हणजे मालमत्ता प्रदर्शनाचा आहे.
...म्हणून गृहप्रकल्पांच्या प्रदर्शनाला वाढता प्रतिसाद
बांधकाम क्षेत्रातील विविध संघटना गेल्या काही वर्षापासून सातत्याने असे प्रदर्शन भरवत आहेत. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता मागील दहा-बारा वर्षात अशा प्रदर्शनाचे प्रमाण खूपच वाढले आहे. वर्षातून सात-आठ प्रदर्शने मुंबई महानगर प्रदेशात भरताना दिसतात. महत्त्वाचे या प्रदर्शनात गृहकर्जही उपलब्ध करून दिले जातो. तसेच विविध सवलतींचा लाभ येथे मिळत असल्याने याला भरघोस प्रतिसाद मिळतो. पण कोरोनाचा कहर सुरु झाल्यापासून अशा प्रदर्शनाला ब्रेक लागला आहे. कोरोनामुळे अशा कार्यक्रमावर बंदी आली आहे. मोठ्या संख्येने प्रदर्शनात सहभागी होत असल्याने खबरदारी म्हणून अशा कार्यक्रमावर बंदी आहे.