नवी दिल्ली – दूरसंचार ऑपरेटर व्होडाफोन, आयडिया आणि भारती एअरटेलने प्रिमियम प्लॅनचे जोरदार समर्थन केले आहे. नुकतेच ट्रायने प्रिमियम प्लॅन बंद करण्याचे पत्र व्होडाफोनसह एअरटेलला पाठविले होते.
व्होडाफोन, आयडिया आणि भारती एअरटेलने प्रायोरिटी प्लॅनमध्ये कमी प्रमाणात ग्राहक असल्याचे म्हटले आहे. व्होडाफोनने ट्रायला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, प्रायोरिटी प्लॅनमध्ये दूरसंचारच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येत आहे. मात्र, ट्राय चुकीच्या पद्धतीने नेटवर्कचा दर्जा कमी होईल, असा अंदाज करत आहे. यापूर्वी मोफत सेवा, डाटाचे अमर्यादित प्लॅनबाबत ट्रायने कधीही विचारणा केली नाही, याकडे व्होडाफोन आयडियाने पत्रातून लक्ष वेधले.
काय आहे प्रिमियम प्लॅनचे प्रकरण -
व्होडाफोन आयडियाला प्रिमियमचे प्लॅन तात्पुरते थांबविण्याचे आदेश ट्रायनेदिले होते. या आदेशाला टीडीएसएटीने तात्पुरती स्थगिती दिली आहे. व्होडाफोनने जादा शुल्क आकारून 4जी नेटवर्कची वेग देणारी प्रिमियम योजना ग्राहकांसाठी सुरू केली आहे. जादा शुल्काने ग्राहकांना वेगवान डाटा दिल्याने इतर ग्राहकांची सेवा विस्कळित होवू शकते, अशी ट्रायने पत्रातून चिंता व्यक्त केली होती. हा मुद्दा अधोरेखित करत ट्रायने व्होडाफोन आयडियाला प्रिमिअम प्लॅन बंद करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला व्होडाफोन आयडियाने टीडीएसएटीमध्ये आव्हान दिले. ट्राय ही चौकशी करत कायद्याचे पालन करून अंतिम आदेश देण्यासाठी स्वतंत्र आहे. मात्र, नैसर्गिक न्याय मिळवून देण्याकरता व्होडाफोन आयडियाला संधी दिल्याचे टीडीएसएटीने आदेशात म्हटले होते.
दरम्यान, एअरटेलचे एप्रिलमध्ये 5.26 दशलक्ष, तर व्होडाफोन आयडियाचे 4.51 दशलक्ष ग्राहक कमी झाले आहेत. जिओच्या ग्राहकांची संख्या एप्रिलमध्ये 1.57 दशलक्षने वाढली आहे.