वॉशिंग्टन -अमेरिका आणि चीनमध्ये व्यापाराबाबतची बैठक ३० एप्रिलला बीजिंगमध्ये होणार आहे. या बैठकीत व्यापाराबाबतच्या दुसऱ्या फेरीविषयी चर्चा केली जाणार असल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.
बीजिंगमधील होणाऱ्या चर्चेसाठी अमेरिकेच्या प्रतिनिधींचे नेतृत्व हे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लिघथीझर आणि ट्रीझरी सेक्रेटरी स्टीव्हन म्यूचिन करणार आहेत. तर चीनचे उपपंतप्रधान लूई हे अधिक चर्चेसाठी ८ मे रोजी वॉशिंग्टनला येणार असल्याचे अमेरिकेच्या माध्ममांनी म्हटले आहे. पुढील बैठकीच्या चर्चेत बौद्धिक संपदा, तंत्रज्ञानाचे हस्तांतरण, शुल्काचे बंधन नसणे, कृषी, सेवा, खरेदी आणि अंमलबजावणी अशा विषयावर चर्चा होणार आहे.
गतवर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणानंतर चीन व अमेरिकेमधील व्यापारी संबंधात कटुता आली आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापारी तडजोडी करण्यासाठी गतवर्षी डिसेंबरपासून चर्चेच्या विविध फेऱ्या घेण्यात आल्या आहेत. व्यापारी वाद असल्याने दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. तसेच जगभरातील आर्थिक बाजारपेठेचेही मोठे नुकसान झाले आहे.
चीनबरोबरील व्यापाराविषयीची चर्चा चांगली झाल्याचे वक्तव्य फेब्रुवारीमधील बैठकीनंतर ट्रम्प यांनी केले होते. नव्या व्यापारी करारात अनुचित व्यापार पद्धत संपविणारे रचनात्मक आणि वास्तववादी बदल चीनकडून व्हावेत अशी ट्रम्प यांनी अपेक्षा केली होती. यामुळे व्यापारी तूट कमी होईल तसेच अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्यांचे संरक्षण होईल, असेही ट्रम्प म्हणाले होते. डिसेंबरमध्ये चीनने अमेरिकेतून आयात होणाऱ्या वाहनांवरील आयात कराचे शुल्क कमी केले आहे. सध्या अमेरिकन कंपन्यांच्या बौद्धिक संपदाचे हितसंरक्षण करणे हा बैठकीतील महत्त्वाचा विषय असणार आहे.