वॉशिंग्टन - अमेरिका आणि चीनमधील व्यापारी युद्ध दिवसेंदिवस आणखीनच भडकत आहे. अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने चीनच्या पाच तंत्रज्ञानविषयक कंपन्यांवर शुक्रवारी बंदी घातली आहे. या निर्णयाने चीनमधी सुपरकॉम्प्युटर उत्पादन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे अमेरिका आणि चीनमध्ये आणखी तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.
सुगॉन या चीनच्या सुपरकॉम्प्युटर उत्पादन कंपन्यांसह मायक्रोचिप तयार करणाऱ्या कंपन्यांवर अमेरिकेने बंदी घातली आहे. तर याचबरोबर पीपल्स लिब्रेशन आर्मीच्या कॉम्प्युटिंग इन्स्टिट्यूटवर वाणिज्य मंत्रालयाने बंदी घातली आहे. या बंदीमुळे संबंधित कंपन्यांना अमेरिकेचे तंत्रज्ञान घेता येणार नाही. या कंपन्या अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या विरोधात अथवा अमेरिकेच्या परराराष्ट्र धोरणाशी विसंगत काम करत असल्याचे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे.