नवी दिल्ली - लॉकडाऊन घोषित केले असताना केंद्र सरकारने उज्जवला योजनेतील लाभार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. योजनेतील लाभार्थ्यांना १४.२ किलो एलपीजीचे ३ सिलिंडर एप्रिल ते जूनपर्यंत देण्यात येणार आहेत. यासाठी केंद्र सरकारला १३,००० हजार कोटींचा अंदाजित खर्च करावा लागणार आहे.
कोरोनाच्या संकटात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणाऱ्या दुर्बल घटकांसाठी सरकारने आज योजना जाहीर केली आहे. या दिलासादायक पॅकेजचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वागत केले आहे. आव्हानात्मक काळात सरकार प्रतिसाद देत असल्याचे हे उदाहरण असल्याचे प्रधान यांनी सांगितले.
कोरोनाने निर्माण झालेल्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी १.७ लाख कोटींचे पॅकेज हे दिलासादायक आहे. प्रधानमंत्री उज्जवला योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे हस्तांतरण, विमाकवच, अन्नसुरक्षा व तीन महिने मोफत गॅस सिलिंडर असे दिलासादायक निर्णय घेण्यात आले. त्यामुळे देशात कोणताही गरीब व्यक्ती उपाशी राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, की आपण सर्व एकत्रित आहोत. या अदृश्य शत्रुविरोधात लढाई करणार आहोत. तसेच विजयी होणार आहोत. त्यासाठी आपले सरकार योग्य उपाययोजना करत आहेत. त्यामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेवर कमी नकारात्मक परिणाम होईल, असे त्यांनी सांगितले.