नवी दिल्ली– आरबीआयने 'भारतामधील वाणिज्य बँकांत असलेले प्रशासन' या विषयावर पेपर प्रसिद्ध केले आहेत. जर या पेपरमधील प्रस्तावावर आरबीआयने अंमलबजावणी केली तर कोटक महिंद्र बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ उदय कोटक यांना राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे.
आरबीआयने पेपरमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पूर्णवेळ असलेल्या व्यक्तींचा कार्यकाळ हा जास्तीत जास्त 10 वर्षांचा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ही मर्यादा प्रवर्तकाकडील व्यक्तीसाठी असावी, असे पेपरमध्ये म्हटले आहे, तर प्रवर्तकाशिवाय इतर व्यक्तीसाठी 15 वर्षाची मुदत ठेवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
बँकिंग क्षेत्रात उदय कोटक यांनी सर्वाधिक काळ खासगी बँकेचे सीईओ म्हणून काम पाहिले आहे. ते कोटक महिंद्र बँकेचे 2003 पासून सीईओ पदावर कार्यरत राहिले आहेत.
एचडीएफसी बँकेचे सीईओ आदित्य पुरी हे चालू वर्षात निवृत्त होणार आहेत. आरबीआयने पेपरमधील प्रस्तावाप्रमाणे बदल केल्यास अॅक्सिस बँक, येस बँक, इंडसइंड बँक या खासगी बँकेमध्ये मोठे बदल होणार आहेत. या पेपरमध्ये बँकाच्या संचालक मंडळाला मोठे अधिकार देण्याची शिफारस केली आहे. व्यवस्थापनामधून मालकी बाजूला काढणे आणि जोखीमच्या व्यवस्थापनाचे योग्य रणनीती आखणे या प्रस्तावाचा पेपरमध्ये समावेश आहे.
जगभरात सुरू असलेल्या पद्धतीप्रमाणे सध्याच्या नियमनाचा आकृतीबंध आखणे हा पेपरचा उद्देश आहे. भारतमधील वित्तीय व्यवस्था ही गुंतागुंतीची आणि मोठी होत असल्याचे निरीक्षण पेपरमध्ये नोंदविण्यात आले आहे. अशा परिस्थितीमध्ये बँकांचे प्रशासन मजबूत करणे महत्त्वाचे असल्याचे आरबीआयने पेपरमध्ये म्हटले आहे. या पेपरवर भागीदार व्यक्ती 15 जुलै 2020 पर्यंत प्रतिक्रिया पाठवू शकणार आहेत.
दरम्यान, उदय कोटक यांची नुकतेच भारतीय उद्योग महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांनी उद्योगांना आत्मनिर्भर भारतासाठी धाडसाने गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता.