न्यूयॉर्क- चीन व अमेरिकेदरम्यान व्यापारी युद्धाचा भारताला फायदा होण्याची शक्यता आहे. चीनमध्ये असलेल्या २०० अमेरिकन कंपन्यांनी भारतात येण्यासाठी स्वारस्य दाखविल्याची माहिती यूएसआयएसपीएफचे अध्यक्ष मुकेश अघी यांनी दिली. ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री के.पलानस्वामींच्या भेटीनंतर बोलत होते.
यूएस इंडिया स्ट्रॅटजीक पार्टनरशीप फोरम (यूएसआयएसपीएफ) ही संस्था अमेरिका-चीनमधील व्यापार संबंधांना चालना देण्यासाठी प्रयत्न करते. या कंपनीकडे चीनमधील २०० अमेरिकन कंपन्यांनी भारतात येण्याची तयारी दाखविली आहे. त्यामधून २१ अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतात येवू शकते, असे मुकेश अघी यांनी सांगितले. चीनमधून भारतामध्ये येण्याची कंपन्यांची तयारी पाहता तामिळनाडू त्यांच्यासाठी रेडकार्पेट अंथरेल, अशा विश्वास अमेरिकेमधील भारताचे राजदूत संदीप चक्रवर्ती यांनी व्यक्त केला.
हेही वाचा-डॉलरपुढे रुपयाची घसरगुंडी; गेल्या ९ महिन्यातील गाठला तळ
बौद्धिक संपदा हक्क कायदा आणि उद्योगानुकलता या कारणांनी अमेरिकेबरोबर चीनचे व्यापार युद्ध सुरू आहे. चीनमधील अमेरिकन कंपन्यांनी इतरत्र स्थलांतरण केल्यास त्यांची डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या आयात शुल्कामधून सुटका होवू शकते. हे वाढीव शुल्क सप्टेंबरपासून लागू होणार आहे. अमेरिकन कंपन्यांना भारतामध्ये येण्यासाठी सरकार काय करू शकते, याची माहिती अघी यांनी यूएसआयएसपीएफचे सदस्य आणि अमेरिकेचे भारतामधील माजी राजदूत फ्रँक विस्नर यांना दिली.