वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनबरोबरी व्यापारी युद्धात पुन्हा एकदा वाढीव आयात शुल्काचे हत्यार उपसले आहे. चीनच्या उत्पादित मालावरील आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय शुक्रवारी ट्रम्प यांनी जाहीर केला आहे. चीनने अमेरिकेच्या मालावर आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर जशात तसे पद्धतीने ट्रम्प यांनीदेखील आयात शुल्क वाढविणार आहेत.
चीनच्या २५० अब्ज डॉलर किमतीच्या मालावर १ ऑक्टोबरपासून आयात शुल्क वाढविण्यात येणार आहे. सध्या हे आयात शुल्क २५ टक्के आहे. ते १ ऑक्टोबरपासून ३० टक्के होणार असल्याचे ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या प्रसिद्धी निवेदनात म्हटले आहे. चीनच्या उर्वरित ३०० अब्ज डॉलरच्या उत्पादित मालावारील आयात शुल्क हे १ स्पटेंबरपासून १५ टक्के लागू होणार आहे. सध्या हे आयात शुल्क १० टक्के आहे. धन्यवाद, या विषयाकडे लक्ष दिल्याबद्दल असे त्यांनी उपहासात्मक पद्धतीने म्हटले आहे.
ट्रम्प यांनी चीनवर मुख्यत: निशाणा साधला आहे. याचवेळी त्यांनी इतर देशांना सूचक असा इशाराही दिला आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे, अनेक वर्षांपासून चीन आणि इतर देश हे अमेरिकेच्या व्यापाराचा फायदा घेत आहेत. यामध्ये बौद्धिक संपदाची चोरी आणि इतर बाबींचा समावेश आहे. दरवर्षी अमेरिका चीनला हजारो अब्ज डॉलर गमवित आलेला आहे. दुर्दैवाने पूर्वीच्या प्रशासनाने चीनला योग्य व संतुलित नसलेल्या व्यापार करण्यासाठी परवानगी दिली. त्याचा परिणाम म्हणून अमेरिकेच्या करदात्यांवर बोजा निर्माण झाला. राष्ट्राध्यक्ष म्हणून हे मी घडू देणार नाही. उचित व्यापार करण्यासाठी आपण असंतुलित व्यापारी संबंध हे सुंतिलत करायला पाहिजेत. चीनने अमेरिकेच्या ७५ अब्ज डॉलर मुल्याच्या उत्पादनांवर नवे आयात शुल्क लादू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.
चीनने आयात शुल्क वाढीची केली आहे घोषणा-
चीनने अमेरिकेच्या ७५ अब्ज डॉलर मुल्याच्या उत्पादनांवर १० टक्के आयात शुल्क लादणार असल्याची घोषणा केली. यापूर्वी अमेरिकेने ३०० अब्ज डॉलर मुल्याच्या उत्पादनावर आयात शुल्क लागू करणार असल्याची डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिली होती. दोन्ही आर्थिक महासत्ता असलेले देश व्यापारी युद्ध करत असताना आयात शुल्काचा हत्यारासारखा वापर करत आहेत.