नवी दिल्ली- केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. मात्र इलेक्ट्रीक मोबिलिटी संक्रमणाने देशातील रोजगाराच्या संधी कमी होऊ नयेत, असे स्पष्ट मत केंद्रीय अवजड मंत्री अरविंद सावंत यांनी व्यक्त केले. ते असोचॅमच्या कार्यक्रमात बोलत होते.
सध्याच्या कंबशन इंजिन निर्मितीसाठी वाहनांच्या सुट्ट्या भागांची आवश्यकता असते. त्यामुळे अधिक रोजगार निर्मिती होत असल्याचे कंबशन इंजिन उत्पादकांनी सांगितल्याचे अरविंत सावंत यांनी माहिती दिली.
इलेक्ट्रीक वाहनांसाठी कमी सुट्ट्या भागांची गरज असल्याने रोजगार निर्मिती कमी होणार आहे. मात्र, देशाला अधिक रोजगार निर्मिती करण्याच्या संधी हव्या आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. याच कार्यक्रमात नीती आयोगामधील मुख्य सल्लागार अनिल श्रीवास्तव उपस्थित होते. ते म्हणाले, इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये केवळ मनाची स्थिती (माइंडसेट) हेच आव्हान आहे. इलेक्ट्रिक वाहनांचे फायदे आपण टाळू शकत नाही. बॅटरी उत्पादक करणाऱ्या पहिल्या काही कंपन्यांना सरकारकडून आर्थिक सवलतही देण्यात येईल, अशी त्यांनी घोषणाही केली.