नवी दिल्ली -नवे केबल दर लागू केल्यानंतर ग्राहकांनी प्रसारण वाहिन्यांच्या वितरकाबाबत तक्रारी केल्या आहेत. यावर कार्यवाही करत दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नियमानुसार एकाच पॅकमध्ये प्रसारण वाहिनी दाखविण्याची सूचना प्रसारण वाहिनीच्या वितरकांना केली आहे.
एकाच प्रकारच्या पॅकची प्रसारण वाहिनी दुसऱ्या पॅकमध्ये दिसत असल्याने ग्राहकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नियमांचे पालन करण्याची सूचना प्रसारण वाहिन्यांचे वितरक तसेच डीटीएच ऑपरेटरला ट्रायने दिले आहेत.
काय आहे ट्रायचा नियम-
ट्रायने जुलै २०१८ मध्ये प्रसारण वाहिन्यांना त्यांच्या अध्यात्मिक, सर्वसाधारण, मनोरंजन, सिनेमा, वृत्तवाहिन्या असे विविध पॅक जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. या नियमानुसार प्रसारण वाहिन्यांचे प्रत्येक वितरक हे विशिष्ट प्रसारण वाहिन्यांचा क्रमांक केबल नेटवर्कवर नोंदणी करतात. त्यातील केबल क्रमांक बदलला तर ईलेक्ट्रॉनिक प्रोग्रॅम गाईडमध्ये बदल करणे बंधनकारक आहे.
ट्रायने केबल दरात बदल करून ग्राहकांना ज्या प्रसारण वाहिन्या पाहिजेत तेवढचे पैसे देण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यानुसार प्रत्येक प्रसारण वाहिन्यांना त्यांच्या स्वतंत्र शुल्काची माहिती द्यावी लागते.