नवी दिल्ली- भारताचा अमेरिकेबरोबर असलेला व्यापारी वाद मिटण्याची शक्यता आहे. अमेरिकेबरोबर पुढील आठवड्यात व्यापारी वादाबाबत चर्चा होणार असल्याचे सूत्राने सांगितले.
पुढील आठवड्यात अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींचा गट देशाच्या वाणिज्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जी २० परिषदेदरम्यान चर्चा झाली होती. त्यानंतर प्रथमच दोन्ही देशांमध्ये व्यापारी संबंधावर चर्चा होत आहे.
अमेरिकेने भारताचा व्यापार प्राधान्यक्रमाचा दर्जा (जीएसपी) काढून घेतल्यानंतर दोन्ही देशात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अमेरिकेतून आयात होणाऱ्या २८ उत्पादनांवरील आयात शुल्क भारताने वाढविले होते. देशाची दूध उत्पादनाची बाजारपेठ अधिक खुली करून द्यावी, अशी अमेरिकेची मागणी आहे. तसेच काही उत्पादनांवरील आयात शुल्क कमी करावे, अशी अमेरिकेची भारताकडून अपेक्षा आहे.
जीएसपी काढून घेताना भारताच्या धोरणावर केली होती टीका-
अमेरिकेला समान आणि योग्य प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी आश्वस्त केले नसल्याचा ठपकाही ट्रम्प यांनी भारतावर ठेवला होता. भारताचा जीएसपी काढून घेण्याच्या निर्णयाला अमेरिकेच्या वरिष्ठ लोकप्रतिनिधींनी विरोध केला असतानाही ट्रम्प यांनी जीएसपी काढून घेत असल्याची घोषणा केली होती.