हैदराबाद- जगातील सर्वात श्रीमंत हिंदू मंदिर असलेले तिरुपती मंदिर हे सोने ठेवण्यासाठी योग्य अशा बँकेच्या शोधात आहे. हे सोने पंजाब नॅशनल बँकेच्या मुदत ठेवीतून परत मिळालेले आहे. तिरुपती देवस्थानाचे हे सोने १ हजार ३८१ किलो एवढे आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) हे श्री वेंकटेश्वर मंदिराचे व्यवस्थापन करते. या मंदिर समितीने ७ हजार २३५ किलोचे सोने दोन राष्ट्रीयकृत बँकांमध्ये वेगवेगळ्या सुवर्ण ठेव योजनेतून ठेवले आहेत. टीटीडीने १ हजार ९३४ किलो सोने हे पंजाब नॅशनल बँकेत ठेवले होते. तीन वर्षाची मुदत संपल्याने हे सोने टीटीडीला परत मिळाले आहे. आता हे सोने कुठल्या बँकेत ठेवायचे हा निर्णय टीटीडी बोर्ड घेणार आहे.
टीटीडी वेगवेगळ्या सुवर्ण ठेवी योजनांचा अभ्यास करत आहे. त्यातून उत्कृष्ट अशा योजनेची निवड करून संबंधित बँकेत टीटीडी सोने ठेवणार आहे. उर्वरित ५५३ किलो सोने हे लहान दागिने आणि ग्राहकांनी दान केलेले इतर सोने आहे.
निवडणूक आयोगाच्या पथकाने अडविला होता सोने घेवून जाणारा ट्रक
पंजाब नॅशनल बँकेच्या ट्रकमधून टीटीडीचे सोने चेन्नईच्या शाखेतून तिरुपती येथे आणले जात होते. हा ट्रक तामिळनाडुच्या निवडणूक यंत्रणेने तिरुवल्लूर येथे १७ एप्रिलला अडविला होता. दुसऱ्या दिवशी मतदान पार पडले जाण्यापूर्वी ही घटना घडली होती. सुरुवातीला टीटीडीने ते सोने आपले नसल्याचा दावा केला होता. ते सोने टीटीडीचे असल्याची सर्व कागदपत्रे पीनएबीने आयकर विभागाला दिली. त्यानंतर ते सोने दोन दिवसानंतर टीटीडीच्या खजिन्यात पोहोचले. तिरुपती मंदिराचे सोने २००६ मध्ये पीएनबीमध्ये ठेवले होते. ठेवीवरील व्याज म्हणून टीटीडीला पीएनबी बँकेने ७० किलो सोने दिले आहे. प्रति वर्षी देवस्थानाला हुंडीमधून १ हजार ते १ हजार २०० कोटी रुपयांचे प्रति वर्षी उत्पन्न मिळते.
एवढ्या आहेत तिरुपती मंदिराच्या ठेवी-
टीटीडीला २०१९-२० मध्ये ३ हजार ११६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे. सूत्राच्या माहितीनुसार देवस्थानाच्या विविध बँकांमध्ये १२ हजार कोटींच्या ठेवी आहेत. तर वर्षाला सुवर्ण ठेवीवर १०० किलो सोने व्याज म्हणून मिळत असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी प्रत्यक्षात देवस्थानाकडील एकूण संपत्तीचे मूल्य करणे कठीण आहे. कारण हिऱ्यांचे दागिने, रथयात्रेत बाहेर काढण्यात येणाऱ्या अनमोल मूर्ती यांचे मूल्य अब्जावधी रुपये आहे.