नवी दिल्ली – केंद्र सरकारने टिकटॉकसह 58 अॅपवर बंदी लागू केल्यानंतर टिकटॉकचे सीईओ केव्हीन मेयर यांनी भारतीय कर्मचाऱ्यांकडे भूमिका स्पष्ट केली आहे. टिकटॉकमध्ये काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांची कपात करणार नसल्याचे केव्हीन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून आश्वासन दिले आहे. डिजिटल इंडियामध्ये सक्रिय काम करण्यासाठी पुढेही काम सुरू राहील, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
टिकटॉकचे सीईओ केव्हीन मेयर यांनी बाईटडान्सच्या 2 हजार भारतीय कर्मचाऱ्यांना संबोधित केले. सूत्राच्या माहितीनुसार टिकटॉकचे सीईओ केव्हीन मेयर यांनी बाईटडान्सकडून (टिकटॉकची पालक कंपनी) भारतात गुंतवणूक वाढविण्यात येणार असल्याचे कर्मचाऱ्यांना सांगितले. कंपनीची टीम ही सरकारी संस्थेमधील सदस्यांबरोबर चर्चा करत असल्याची माहिती मेयर यांनी कर्मचाऱ्यांना दिली. लवकरच मार्ग निघेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
टिकटॉक इंडियाचे प्रमुख निखील गांधी आणि हॅलो अपचे प्रमुख रोहन मिश्रा हे सरकारी अधिकाऱ्यांबरोबरील बैठकीला उपस्थित होते. टिकटॉक कंपनी डाटा सुरक्षितता आणि सुरक्षेच्या गरजांसाठी भारतीय कायद्याचे पालन करत राहणार असल्याचे टिकटॉकच्या सीईओने कर्मचाऱ्यांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे. वापरकर्त्याची गोपनीयता आणि एकतेला सर्वाधिक प्राधान्य असल्याचे त्यांनी ई-मेलमध्ये नमूद केले आहे.
सूत्राच्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्रालय, दूरसंचार आणि कायदा मंत्रालयाच्या सचिवांची संयुक्त समिती टिकटॉकच्या प्रतिनिधींची बुधवारी भेट घेणार आहेत. या संयुक्त समितीने अंतिम निर्णय घेईपर्यंत चिनी अॅपवरील बंदी कायम राहणार आहे. खूप दिवसांपासून चिनी अॅप हे सरकारच्या रडारवर होते. ते भारतीय वापरकर्त्यांचा डाटा हा अनधिकृत पद्धतीने चोरून भारताबाहेरील सर्व्हरला पाठवित होते, अशी सरकारी सूत्राने माहिती दिली.
इंटरनेट फ्रीडम फाउंडेशनचे कार्यकारी संचालक अपार गुप्ता यांनी चिनी अॅपवरील बंदीवरून सरकारवर टीका केली. अॅपवरील बंदी लागू करण्यासाठी सरकारने कायदेशीर आदेश काढायला पाहिजेत, अशी त्यांनी मागणी केली.