नवी दिल्ली- टाटा मोटर्सने प्रवासी वाहनांच्या किमती २० हजार रुपयापर्यंत वाढविल्याचे जाहीर केले आहे. उत्पादन आणि सेमीकंडक्टरचा खर्च वाढल्याने टाटा मोटर्सने किमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
मारुती सुझुकी आणि महिंद्रा अँड महिंद्रा पाठोपाठ टाटा मोटर्सनेही वाहनांच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कच्चा माल असलेले स्टील, मौल्यवान धातू आणि सेमीकंडक्टरच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे वाढलेल्या खर्चाचा भार ग्राहकांवर टाकणे भाग पडल्याचे टाटा मोटर्सने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. या वाहनांच्या किमती किरकोळ रकमेपासून २६ हजार रुपयापर्यंत वाढणार आहेत.
हेही वाचा-केंद्रीय अर्थसंकल्प: परंपरेप्रमाणे उद्या होणार हलवा समारंभ; अर्थसंकल्पाची होणार नाही छपाई
ज्या ग्राहकांनी २१ जानेवारीपूर्वी वाहनाच्या खरेदीसाठी नोंदणी केली असेल तर त्यांना ही दरवाढ लागू होणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले. टाटा मोटर्स प्रवासी वाहनांच्या श्रेणीत हॅचबॅक टियागो (किंमत ४.७ लाखांपासून पुढे ) ते एसयूव्ही हॅरीयर (१९.१ लाख-एक्श शोरुम दिल्ली) अशा वाहनांचा समावेश आहे. टाटा मोटर्सने चालू आर्थिक वर्षात गेल्या ३३ तिमाहीच्या तुलनेत वाहन विक्रीत मोठा उच्चांक नोंदविला आहे.
हेही वाचा-संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; ३० जानेवारीला पंतप्रधान घेणार सर्वपक्षीय बैठक
मारुती सुझुकीनेही वाढविले आहेत दर-
मारुती सुझुकीने सोमवारी काही निवडक मॉडेलच्या किमती ३४ हजार रुपयापर्यंत वाढविल्या आहेत. मारुती सुझुकीनेही उत्पादन खर्च वाढल्याने किमती वाढण्यामागे कारण सांगितले होते.