मुंबई- राज्यात इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती क्षेत्राच्या वाढीला मोठी संधी आहे. त्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणुकदारांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी. त्यांना सर्व सुविधा व सोयी उपलब्ध करून दिल्या जातील, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आवाहन केले. ते इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकीवर वेबिनारमध्ये बोलत होते.
राज्य सरकारच्यावतीने विविध क्षेत्रात गुंतवणूक वाढीसाठी आयोजित केलेल्या इन्व्हेस्ट इंडिया फोरममध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की इलेक्ट्रॉनिक वस्तू क्षेत्रात गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र योग्य ठिकाण आहे. सध्या कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. परंतु गॅझेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. घरी राहून काम करणाऱ्यांनादेखील इलेक्ट्रॉनिक गॅझेटमुळे मोठी मदत झालेली आहे. पुढील काळात इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती क्षेत्राची मोठी वाढ होणार आहे.
हेही वाचा-शेअर बाजार ५९५ अंशांनी वधारून बंद; 'या' कारणाने वधारले शेअर
राज्य सरकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती क्षेत्रासाठी विशेष धोरण आहे. त्याद्वारे काही सवलती दिल्या जात आहेत. गुंतवणुकदारांना योग्य प्रोत्साहने दिली जात आहेत. याशिवाय डेटा सेंटर्स, विकास आणि संशोधन केंद्र, सुसज्ज इंटनेट जाळे आदीमुळे गुंतवणूकदार महाराष्ट्राला अधिक पसंती देतात, असे उद्योगमंत्र्यांनी वेबिनारमध्ये म्हटले आहे. राज्यात मुबलक प्रमाणात व दर्जेदार मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे देश-विदेशातील गुंतवणुकदारांनी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी राज्याची निवड करावी, असे आवाहन देसाई यांनी केले.