मुंबई - जेट एअरवेजची विमान सेवा बंद झाल्याने स्पर्धक कंपन्यांनी ग्राहक मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. स्पाईसजेट देशात नव्या २० विमान सेवा सुरू करणार आहे. त्यापैकी १८ विमान सेवा या देशाची आर्थिक राजधानी मुंबईला जोडणाऱ्या आहेत.
स्पाईसजेटने १ एप्रिलला नव्या १०६ विमान सेवांची घोषणा केली. त्यामधील ७३ विमान सेवा मुंबईला जोडणाऱ्या आहेत. स्पाईसजेटची मुंबईहून तिरुवनंतपुरम, विजयवाडा आणि तिरुपतीला जाणारी विमान सेवा अनुक्रमे २६ मे आणि ३० मे रोजी सुरू होणार आहे.
मुंबई-कोलकाता ही विमान सेवा केवळ बुधवार आणि रविवारी सुरू राहणार आहे. याशिवाय इतर विमान सेवा रोज सुरू असणार आहेत. दिल्लीला जोडणाऱ्या १६ तर मुंबई ते दिल्ली मार्गावर ८ विमान सेवा असणार आहेत. या विमान सेवेमुळे विजयवाडा,गोवा, हैदराबाद, कोची, कोलकाता, कानपूरमधील प्रवाशांची सोय होणार आहे.
सध्या स्पाईसजेटची देशात रोज ५३९ विमानांची उड्डाणे होतात. ही विमान सेवा देशात ५३ ठिकाणी तर आंतरराष्ट्रीयपातळीवर ९ ठिकाणी आहेत. एअर इंडियादेखील मुंबई- दुबई-मुंबई अशी विमान सेवा १ जुनपासून सुरू करणार आहे.