महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

...तर रेल्वे स्टेशन, विमानतळांसह मॉलमध्ये मिळणार 'कुल्हड'मधून चहा - नितीन गडकरी

मॉलमध्येही कुल्हडचा वापर करावा, यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या निर्णयाने स्थानिक कुंभारांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. तसेच पर्यावरणाचे संवर्धन राहून प्लास्टिक निर्मूलन होणे शक्य आहे.

संग्रहित - रेल्वे विभाग

By

Published : Aug 25, 2019, 4:05 PM IST

नवी दिल्ली- चहा हा बहुतांश सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिकच्या कपामधून देण्यात येतो. मात्र तुम्हाला लवकरच रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि मॉलमध्ये मातीच्या भांड्यामधून (कुल्हाड) चहा मिळणार आहे. तशी सूचना करणारे पत्र केंद्रीय वाहतूक आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना लिहिले आहे.

नितीन गडकरी म्हणाले, देशातील १०० रेल्वे स्टेशनमध्ये कुल्हडमधून चहा देणे बंधनकारक करावे, असे पत्र पियूष गोयल यांना लिहिले आहे. तसेच विमानतळ, राज्यातील बस डेपोमधील चहा स्टॉलमध्ये कुल्हड बंधनकारक करावे, असे सूचविले आहे. मॉलमध्येही कुल्हडचा वापर करावा, यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या निर्णयाने स्थानिक कुंभारांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. तसेच पर्यावरणाचे संवर्धन राहून प्लास्टिक निर्मूलन होणे शक्य आहे. मोठ्या प्रमाणात मातीचे भांडे (कुल्हड) उपलब्ध करून देण्याची सूचना खादी आणि ग्रामोद्योग आयोगाला (केवायआयसी) देण्यात आल्याचे गडकरींनी सांगितले.

केव्हीआयसीचे चेअरमन विनय कुमार सक्सेना म्हणाले, आम्ही १० हजार कुंभारांना इलेक्ट्रिक चाकांचे वाटप केले आहे. चालू वर्षात २५ हजार इलेक्ट्रिक चाके वितरित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केल्याचे त्यांनी सांगितले. कुंभार शक्तिकरण योजनेअंतर्गत कुंभारकाम करणाऱ्यांना इलेक्टिक चाकांचे वाटप करण्यात येते. त्यातून उत्पादन वाढावे, हा सरकारचा हेतू आहे.

सध्या, रेल्वे प्रवाशांना कुल्हडमधून चहा मिळण्याची सोय वाराणशी आणि रायबरेलीच्या रेल्वे स्टेशनवर आहे.

तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी २००४ मध्ये कुल्हड योजना ही जाहीर केली होती. यामधून हस्तकला उद्योगाला चालना मिळावी व पर्यावरणस्नेही कपामधून प्रवाशांना चहाची चव मिळावी, हा त्यांचा हेतू होता.

ABOUT THE AUTHOR

...view details