नवी दिल्ली- कोरोना संसर्गजन्य रोग हा देशातील स्मार्टफोन उद्योगालाही विळखा घालणार आहे. स्मार्टफोनसाठी लागणाऱ्या सुट्या भागांसाठी आणि सब-असेंम्बलीसाठी भारतीय उद्योगांची चीनवर भिस्त आहे. मात्र, चीनमधील कोरोना रोगामुळे सुट्या भागांच्या पुरवठ्यात अडथळा येणार असल्याचे बाजार विश्लेषकांनी सांगितले.
येत्या काही दिवसांत चीनमधील बंद पडलेल्या कंपन्या सुरू होतील, अशी स्मार्टफोन उद्योगाला अपेक्षा आहे. यापूर्वीच उद्योगावर परिणाम झाल्याचे इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे (आयसीईए) चेअरमन पंकज मोहिंद्रु यांनी सांगितले. हा संपूर्ण आठवडा 'थांबा आणि वाट पाहा', अशा स्थितीत असल्याचेही मोहिंद्रु यांनी सांगितले. बाजारपेठेतील लोकांच्या मते प्रत्यक्ष स्थिती खूप वाईट आहे. बाजारातील मागणी कमी आहे. आगामी 'मोबाईल वर्ल्ड काँग्रेस'वरही कोरोनाचे सावट असणार आहे. हा मोबाईल उद्योगातील जगातील सर्वात मोठा कार्यक्रम असतो.