नवी दिल्ली - केंद्र सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदर जानेवारी- मार्च या तिमाहीसाठी 'जैसे थे' ठेवले आहेत. काही बँकांनी मुदत ठेवीवरील व्याज दरात कपात केली आहे. अशा स्थितीत अल्पबचत योजनांवरील व्याज दरात कपात न झाल्याने बचत करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
अल्पबचत योजनांसाठी व्याज दर तीन महिन्यांनी जाहीर करण्यात येतात. मागील तिमाहीचेच व्याज दर हे १ जानेवारी २०२० ते ३१ मार्च २०२० कालावधीसाठी असणार आहेत.
हेही वाचा-विनाअनुदानित गॅस सिलिंडर १९ रुपयाने महाग
असे आहेत अल्पबचत योजनांवरील व्याज दर
- सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) या दोन्हींचा वार्षिक व्याजदर हा ७.९ टक्के आहे.
- ११३ महिन्यांच्या मुदतीसाठी किसान विकास पत्रावर (केव्हीपी) वार्षिक ७.६ टक्के व्याज देण्यात येणार आहे.
- ज्येष्ठ नागरिकांसाठी पाच वर्षांच्या बचत योजनेवरील ८.६ टक्के व्याज कायम ठेवण्यात आले आहे. या योजनेचे व्याज दर तीन महिन्यांनी देण्यात येते.
- बचत खात्यावर वार्षिक ४ टक्के व्याज देण्यात येते.
- सुकन्या समृद्धी योजनेवर ८.४ टक्के व्याज असणार आहे.
- १ ते ५ वर्षाच्या मुदत ठेवीसाठी ६.९ ते ७.७ टक्के व्याज दर आहे. या योजनेवरील व्याज दर तीन महिन्यांनी देण्यात येते.
- पाच वर्षाच्या रिकरिंग मुदत ठेवीवर ७.२ टक्के व्याज दर लागू आहे.
हेही वाचा-'मोदी सरकारचा फसविण्यावर आणि बढाया मारण्यावर विश्वास'
केंद्र सरकारने वर्ष २०१६ मध्ये अल्पबचत योजनांचे व्याजदर हे सरकारी रोख्यांच्या उत्पन्नाशी संलग्न करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेने मागील तिमाहीत महागाई वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर रेपो दर 'जैसे थे' ठेवला होता.