नवी दिल्ली - देशात वाहन उद्योगात मंदीचे चित्र असताना अर्थव्यवस्थाही मंदावलेली आहे. याबाबत आरबीआयचे माजी गव्हर्नर विमल जालान यांनी भाष्य केले आहे. देशाची मंदावलेली अर्थव्यवस्था ही चक्रीय असल्याचे जालान म्हणाले. एक ते दोन वर्षात अर्थव्यवस्था पुन्हा गती घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विमल जालान म्हणाले, सरकारने अनेक सुधारणांची घोषणा केल्या आहेत. त्याच्या अंमलबजावणीचा विशेषत: गुंतवणुकीच्या अंमलबजावणीचा प्रश्न आहे. मात्र सध्याची स्थिती ही १९९१ पेक्षा खूप वेगळी आहे. तेव्हा विविध आर्थिक आघाडीवर देश संकटाला सामोरे जात होता. सध्या देश खूप बळकट आहे. जर तुम्ही पाहिले तर दिसेल की, महागाईचा दर कमी आहे. तर गंगाजळी (रिझर्व्ह) पाहिली तर ती खूप अधिक आहे.
खासगी क्षेत्रात गुंतवणूक का होत नाही, असे विचारले असता त्यांनी नोटाबंदीचा परिणाम झाल्याची शक्यता व्यक्त केली. अथवा ते लोकसभेच्या निकालाची वाट पाहत असावेत, अशीही त्यांनी पुस्ती जोडली. विदेशातून सार्वभौम रोख्यातून घेण्यात येणारे कर्ज हे दीर्घमुदतीचे असावे, असे त्यांनी मत व्यक्त केले. यापूर्वीच सरकारने विदेशातील कर्जरोखे हे ५ ते २० वर्षांसाठी असणार असल्याचे जाहीर केले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला सर्वात मोठा धोका कोणता आहे, असा विचारले असता जालान यांनी बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या असल्याचे सांगितले.
विदेशातील बाजारपेठेमधून कर्ज रोखे विकणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केले होते. गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीबी) भारताची अर्थव्यवस्थेच्या अपेक्षित वृद्धीदरात घट वर्तविली होती.