नवी दिल्ली – मायक्रोसॉफ्टने शेअरचॅटमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर व्हॉट्सअपनेही या कंपनीची दखल घेतली आहे. व्हाट्सअपमध्ये शेअरचॅट व्हिडिओ दिसू शकणार आहेत.
भारतीय समाज माध्यम असलेल्या शेअरचॅटचे एका महिन्यात सरासरी 140 दशलक्षहून अधिक वापरकर्ते आहेत. मराठी, हिंदी, भोजपूरीसह 15 प्रादेशिक भाषांमध्ये शेअरचॅटचा वापर होतो.
व्हॉट्सअपबाबतचे अपडेट देणाऱ्या एका माध्यमात पहिल्यांदाच शेअरचॅटची दखल घेण्यात आली आहे. शेअरचॅटचे व्हिडिओ व्हॉट्सअपच्या नव्या बीटा व्हर्जनमध्ये दिसणार असल्याचे या माध्यमाने म्हटले आहे. शेअरचॅटवरील व्हिडिओ व्हॉट्सअपमध्ये दिसू शकणार आहे. त्यासाठी कंपनीकडून नवीन व्हॉट्सअपच्या बीटा व्हर्जनमध्ये सुविधा देण्यात आली आहे.
शेअरचॅट अंकुश सचदेव, भानूप्रतास सिंह आणि फरीद अहसान यांनी 8 जून 2015 ला सुरू केले. यामध्ये व्हिडिओ, विनोद, गाणी असा विविध कंटनेन्ट वापरकर्त्याला दिसतो. नुकतेच मायक्रॉसॉफ्टने शेअरचॅटमध्ये 10 कोटी डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. शेअरचॅटची प्रतिस्पर्धी असलेल्या टिकटॉकवर सरकारने बंदी लागू केल्यानंतर शेअरचॅटच्या वापरकर्त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.