महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

कांदा निर्यातदार भारताच्या प्रतिमेला मोठा धक्का; बंदी उठविण्याची शरद पवारांची वाणिज्य मंत्र्यांना विनंती - Sharad Pawar meet to Piyush Goyal

कांदा निर्यात बंदीमुळे राज्यातील कांदा उत्पादकांमध्ये नाराजी पसरली आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पीयूष गोयल यांची भेट घेत कांदा निर्यात बंदी उठविण्याची विनंती केली आहे.

संग्रहित - शरद पवार
संग्रहित - शरद पवार

By

Published : Sep 15, 2020, 2:53 PM IST

मुंबई- निर्यात होणाऱ्या कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे. आपण सातत्याने कांदा निर्यात करत आलो आहोत. पण केंद्र सरकारच्या निर्यात बंदीचा आकस्मिक निर्णय घेतला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून असलेल्या प्रतिमेला मोठा धक्का बसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांना भेटीदरम्यान सांगितले.

केंद्र सरकारने आकस्मिकपणे कांद्याची निर्यातबंदी जाहीर केली. त्यावर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक पट्ट्यामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी काल (सोमवारी) रात्री संपर्क करून केंद्र सरकारला या प्रतिक्रियेबाबत अवगत करण्याची विनंती केल्याचे शरद पवार यांनी सांगितले. केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांची शरद पवार यांची आज सकाळी भेट घेतली. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी गोयल यांच्यासमोर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांच्या समस्या सांगितल्या आहेत. बहुसंख्य कांदा उत्पादक हा जिरायत आणि अल्पभूधारक शेतकरी असल्याचा मुद्दा पवारांनी बैठकीत मांडला.

सध्याच्या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात भारत हा निर्यातीच्या बाबतीत एक बेभरवशाचा देश असल्याची प्रतिमा होण्याची शक्यता आहे. ही प्रतिमा आपल्याला परवडणारी नाही. या परिस्थितीचा अनाठायी फायदा पाकिस्तान आणि इतर कांदा निर्यातदार देशांना मिळत असल्याचेही पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. या सगळ्या गोष्टींचा विचार करून कांदा निर्यातबंदी बाबत फेरविचार करावा, अशी विनंती यावेळी पवारांनी वाणिज्य मंत्र्यांना केली.

केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाकडे असलेल्या बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर कांदा निर्यातबंदीचा निर्णय झाल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले. केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय या तिन्ही मंत्रालयांशी चर्चा करून निर्यातबंदीचा फेरविचार करू असे आश्वासन पीयूष गोयल यांनी शरद पवारांना दिले. जर एकमत झाल्यास या बाबत फेर निर्णय घेऊ असेसे केंद्रीय वाणिज्य मंत्री यांनी स्पष्ट केल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्र सरकारने सोमवारी रात्री कांदा निर्यात बंदीचे आदेश काढले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details