नवी दिल्ली - चीनची दूरसंचार कंपनी हुवाईचा ५ जीमध्ये समावेश करताना योग्य विचार करायला हवा, असे मत राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक ले. जनरल राजेश पंत यांनी व्यक्त केले. ५ जी हे केवळ दूरसंचार नेटवर्क नाही, तर यामुळे संपूर्ण क्षेत्रांवर याचा परिणाम होऊ शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ते सीसीआय दूरसंचार परिषदेच्या कार्यक्रमात माध्यमांशी बोलत होते.
ले. जनरल राजेश पंत म्हणाले, हुवाईच्या ५ जीमधील सहभागाबाबत सरकारला निर्णय घ्यायचा आहे. आम्ही तुम्हाला तांत्रिक बाबींवर सांगू शकतो. त्यानंतर राजकीय आणि आर्थिक बाबींवर पाहिले जाऊ शकते. सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याबाबत कसलीही शंका नाही. ५ जी हे केवळ दूरसंचार नेटवर्क नाही. तर ते आपल्या जीवनशैलीशी निगडीत अनेक घटकांशी जोडलेले आहे. देशातील ५ जी तंत्रज्ञान हे इंटरनेट ऑफ थिंग्जशी (आयओटी) जोडण्यात येणार आहे. त्याचा औद्योगिक क्षेत्रासह घरात विविध विद्युत वाहने, आरोग्य उत्पादने, कृषीसह ड्रोनमध्ये वापर केला जाणार आहे.
हेही वाचा-ट्रम्प यांचा 'यू टर्न' : अमेरिकन कंपन्यांकडून तंत्रज्ञान घेण्याकरिता हुवाईला दिली परवानगी
जर कोणी या यंत्रणेत मालवेअर आणला, तर त्यामुळे संपूर्ण दूरसंचार यंत्रणा विस्कळित होऊ शकते. त्याचा परिणाम आरोग्य यंत्रणा, कृषी आणि उद्योगावर होऊ शकतो. त्यामुळे सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे योग्य विचार करून निर्णय घेण्याची गरज आहे. अद्याप त्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. आम्ही देशहित पाहणार आहोत, असेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा-दूरसंचार नेटवर्कच्या सुरक्षेबाबत भारत कसलीही तडजोड करणार नाही - संजय धोत्रे