नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने मद्यसम्राट विजय मल्ल्याची कंपनी युनायटेड ब्रेव्हरीजच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली आहे. या कंपनीने कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय 8 ऑक्टोबरला सुनावणी घेणार आहे.
विजय मल्ल्याच्या कंपनीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ८ ऑक्टोबरला सुनावणी - SC defers hearing plea of Mallya company
विजय मल्ल्याची कंपनी युनायटेड ब्रेव्हरीजकडे कर्जाहून अधिक मालमत्ता आहे. त्यामुळे कंपनीला व्यवसाय गुंडाळण्याची गरज नाही,अशी बाजू कंपनीच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायाधीश यू. यू. ललित यांनी युनायटेड ब्रेव्हरीज कंपनीचे म्हणणे ऐकून घेतले. युनायटेड ब्रेव्हरीजच्यावतीने वरिष्ठ वकील सी. एस. वैद्यनाथन यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. त्यांनी न्यायालयात सांगितले, की 6 हजार 203 कोटी रुपयांचे कंपनीवर कर्ज आहे. तर कंपनीने 14 हजार 500 कोटी रुपये भरण्याची तयारी दर्शविली आहे. कंपनीची मालमत्ता ही कर्जाहून अधिक आहे. त्यामुळे कंपनीला व्यवसाय गुंडाळण्याची गरज नाही, असे वैद्यनाथन यांनी सांगितले.
विजय मल्ल्या सरकारी बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून लंडनमध्ये पळून गेला आहे.कंपनीच्या मालमत्तेचा वापर कर्ज फेडण्यासाठी होऊ शकतो का, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी मागील सुनावणीत केली होती. या विषयावरही पुढील सुनावणीत मुद्दा उपस्थित होणार आहे. दरम्यान, कर्नाटक उच्च न्यायालयाने युनायटेड ब्रेव्हरीज कंपनी गुंडाळण्याचे आदेश दिले होते.