नवी दिल्ली - बँकांच्या शाखा बंद असल्याच्या या निव्वळ अफवा असल्याचे केंद्रीय वित्तव्यवहार मंत्रालयाचे सचिव देवाशीष पांडा यांनी आज स्पष्ट केले. लॉकडाऊन सुरू असताना ग्राहक सेवा शाखा सुरू ठेवण्यासाठी बांधील असल्याचे पांडा यांनी सांगितले. तसेच रोकडची कोणतीही कमतरता नसल्याचेही त्यांनी सांगितले.
बँकांच्या शाखा बंद असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, अशी वित्तीय सेवा विभागाने लोकांना विनंती केली आहे. बँकांच्या शाखा सुरू आहेत. यापुढेही सुरू राहणार असल्याचे देवाशीष पांडा यांनी सांगितले. शाखांसह एटीएममध्ये रोकड असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा-कोरोना होण्याची राणा कपूरला भीती; न्यायालयाकडे मागितला जामीन
दरम्यान, इंडियन बँक्स असोसिएशनने (आयबीए) सर्व बँकांच्या प्रमुखांना सर्व शाखा सुरू ठेवण्याची विनंती केली आहे. तसेच बँकांच्या सीईओनी प्रादेशिक प्रमुखांना योग्य ते निर्णय घेण्याचे आदेश द्यावेत, अशीही आयबीएने अपेक्षा व्यक्त केली आहे.
हेही वाचा-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जवसूलीला स्थगिती, आरबीआयच्या निर्णयाने सामान्यांना दिलासा..
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रधाननमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या गरीब लोकांसमोरील संकटाची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, कोरोनाचा प्रसार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर बहुतांश बँकांनी डिजीटल व्यवहारांचा वापर करण्याची ग्राहकांना विनंती केली आहे.