नवी दिल्ली – अनियंत्रित इंधनाचे दर आणि राज्यांच्या तपासणी नाक्यावरून घेण्यात येणाऱ्या खंडणीने ट्रकमालक त्रस्त झाले आहेत. याप्रकरणी सरकारने हस्तक्षेप घेतला नाही, तर वाहतूक सेवा सुरू राहणे शक्य नसल्याचे वाहतूकदार संघटना एआयटीएमसीने म्हटले आहे.
ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने (एआयटीएमसी) सलग 11 व्या दिवशी इंधनाचे दरवाढ झाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या 11 दिवसात पेट्रोल हे 6.02 रुपयांनी तर डिझेलचे दर हे 6.4 रुपयांनी प्रति लिटरने वाढले आहेत.
ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष कुलरतन सिंग अटवाल म्हणाले, की मध्य प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान, महाराष्ट्र व दिल्ली या राज्यांच्या सीमानाक्यावर पोलीस व आरटीओकडून भ्रष्टाचार होतो. याविषयी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मागील आठवड्यात पत्र लिहून समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. एका वाहनाला सीमेवरून राज्यात जाताना 1,200 ते 3,000 हजार रुपये द्यावे लागत असल्याचा त्यांनी पत्रात दावा केला होता. जर मध्यप्रदेशसारख्या राज्यात पैसे देण्यास नकार दिला तर वाहन ताब्यात घेतले जाते, असेही त्यांनी पत्रात नमूद केले होते.
देशातील वाहतूक सुविधेत ट्रकचालकांकडून घेण्यात येणारी खंडणी ही समस्या आहे. त्याबाबत पंतप्रधान मोदींनी हस्तक्षेप करावा, अशी एआयटीएमसी अध्यक्षांनी मागणी केली आहे.