बंगळुरू- हॉटेलमध्ये गेल्यानंतर ऑर्डर करण्यासाठी तुमच्यासमोर रोबो आला तर.. हे सत्य लवकरच बंगळुरूमधील रेस्टॉरंन्टमध्ये पहायला मिळणार आहे. रोबोट रेस्टॉरंन्ट कंपनी लवकरच रोबोकडून सेवा देणारे रेस्टॉरंन्ट बंगळुरूमध्ये सुरू करणार आहे.
रोबो रेस्टॉरंन्ट इंदिरा नगरमधील 'हाय स्ट्रीट १०० फीट' रोडवर असणार आहे. यामध्ये ग्राहकांना इंडो-एशियनप्रकारचे जेवण मिळणार आहे. तसेच मॉकटेल मेन्यूही असणार आहे.
अशी रोबो देणार सेवा -
रेस्टॉरंन्टमध्ये उशर म्हणजे बसण्याची जागा दाखविणारा १ रोबोट असणार आहे. तर ५ बिअरर्स म्हणजे संदेश देणारे रोबोट असणार आहेत. प्रत्येक टेबलवर जेवण मागविण्यासाठी टॅबलेट असणार आहे. हे रोबोट जेवण आणून देणार आहेत. रोबोट हे इंटरअॅक्टिव्ह प्रकारचे आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असेल किंवा कार्यक्रम असेल तर शुभेच्छाही रोबोकडून ग्राहकांना देण्यात येणार आहे.
बंगळुरुमध्ये विविध प्रकारचे जेवण देणारे रेस्टॉरंन्ट आहेत. रोबोटचेही खुल्या हाताने स्वागत केले जाईल, असा विश्वास रोबोट रेस्टॉरंन्टचे संस्थापक वेंकटेश राजेंद्रन यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, रोबो रेस्टॉरंन्ट बंगळुरुमध्ये सुरू करणे, हे आमचे आजवर स्वप्न राहिलेले आहे. हे स्वप्न सत्यात उतरत असल्याने हा आमच्या टीमसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा विषय आहे. कार्यक्षमपणे काम करण्यासाठी रोबोटचे प्रोग्रॅमिंग करण्यात आले आहे. तसेच कर्मचाऱ्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून रोबोट उत्पादकांकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. यापूर्वी रोबो रेस्टॉरंन्ट कंपनीने चेन्नई आणि कोईम्बतूरमध्ये रोबोट रेस्टॉरंन्ट सुरू केले आहेत.