बंगळुरू - कोरोनाच्या संकटात आरोग्य कर्मचाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी बंगळुरूमधील रुग्णालयाने दोन रोबोंचा वापर सुरू केला आहे. हे रोबो रुग्णालयात आलेल्या रुग्ण व नातेवाईकांचे स्क्रीनिंग करतात.
ताप, कफ, खोकला अशी लक्षणे असलेल्या रुग्णांचे स्क्रीनिंग हे 'मित्र' नावाचे रोबो करतात. हे रोबो लोकांशी देहबोली आणि स्क्रीनमधून संवाद साधू शकतात, अशी माहिती फोर्टिस रुग्णालयाने दिली.
पहिला रोबो अभ्यागतांचे (व्हिझिटर्स), रुग्णांचे, डॉक्टर, परिचारीका, आरोग्य कर्मचारी आणि इतरांचे स्क्रीनिंग करतो. हे स्क्रीनिंग दोन टप्प्यात होते. पहिल्या टप्प्यात तापमान आणि काही प्रश्न विचारून स्क्रीनिंग पूर्ण होते. जर रुग्णाचे तापमान सामान्य आणि कोणतीही कफ आणि सर्दी लक्षणे नसतील तर त्यांना प्रवेश पास दिला जातो. त्यावर स्क्रीनिंगचे परिणाम, रुग्णाचे नाव आणि फोटो दिला जातो.