नवी दिल्ली : २०१९-२० दरम्यान रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तब्बल ५६१.७३ कोटी रुपये दंड वसूल केला आहे. २०१८-१९च्या तुलनेत यात ६ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे.
२०१६ ते २०२० या काळामध्ये रेल्वेने विविध दंडांच्या माध्यमातून १,९३८ कोटी रुपये कमावले आहेत. २०१६ साली वसूल केलेल्या दंडाच्या तुलनेत, गेल्या वर्षीच्या दंडामध्ये ३८.५७ टक्के वाढ करण्यात आली आहे. मध्यप्रदेशमधील आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी केलेल्या अर्जामधून ही माहिती समोर आली आहे.
२०१९-२०मध्ये १.१० कोटी प्रवाशांकडून विनातिकीट प्रवास केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला होता. विनातिकीट प्रवास करताना आढळून आल्यास तिकीटाच्या पैशांव्यतिरिक्त कमीत कमी २५० रुपये दंड भरावा लागतो. दंड न भरल्यास रेल्वे अॅक्टच्या कलम १३७ नुसार त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येतो. यानंतर त्या व्यक्तीला दंडाधिकाऱ्यांसमोर उभे करण्यात येते. दंडाधिकारी त्या व्यक्तीला हजार रुपयांचा दंड किंवा सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावतात.
हेही वाचा :बिहार विधानसभा निवडणूक : भाजप, संयुक्त जनता दल अन् लोक जनशक्ती पक्ष एकत्र लढणार