पुणे - सार्वजनिक पैशाचे संरक्षक म्हणून बँकांवर महत्वाची जबाबदारी आहे. जनतेचा बँकेवर असलेला विश्वास अबाधित ठेवण्यासाठी बँकांनी कायम प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था अर्थात 'एनआयबीएम’ चा सुवर्णमहोत्सवी सोहळा राष्ट्रपती कोविंद यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रपती कोविंद म्हणाले, बँका या आर्थिक व्यवस्थेच्या भरभराटीचे निदर्शक आहेत. बँकांनी आपल्या कार्यक्षमतेमुळे लोकांचा विश्वास आणि आदर मिळविला आहे. देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यामध्ये बँकांनी उत्कृष्ट भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्याच्या वेळी बँकिंग क्षेत्राला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. परंतु त्यानंतरच्या कालावधीत बँकिंग क्षेत्राने केलेली प्रगती समाधानकारक आहे.
हेही वाचा-महागाईचा भडका: विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडर १४४ रुपयांनी महाग
देशातील बहुतांश खेड्यांमध्ये बँकांच्या शाखा आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमनानेही बँकिंग कार्यात अधिक स्थिरता आणली आहे. नियामक म्हणून रिझर्व बँक ऑफ इंडियाची भूमिका व्यापक करण्यात आली आहे. यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल आणि आमच्या आर्थिक प्रणाली अधिक विश्वासार्ह बनतील, असा विश्वास कोविंद यांनी व्यक्त केला.