मुंबई - पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील खातेदारांच्या अडचणी अजूनही संपल्या नाहीत. भारतीय रिझर्व्ह बँकेने पीएमसीवरील निर्बंधात आणखी तीन महिन्यांचा २२ जून, २०२० पर्यंत वाढ केली आहे.
आरबीआयला पीएमसीमध्ये आर्थिक नियमितता आणि एचडीआयएल कंपनीला दिलेल्या कर्जाची चुकीची माहिती आढळून आली होती. त्यामुळे आरबीआयने पीएमसीवर सहा महिन्यांचे निर्बंध २३ सप्टेंबर २०१९ ला लागू केले होते. वाणिज्य बँकेप्रमाणे सहकारी बँकेला योजना लागू करण्याचे आरबीआयला अधिकार नाहीत. असे असले तरी ठेवीदार आणि सहकारी बँकांची स्थिरता टिकविण्यासाठी आरबीआयने भागीदार आणि विविध यंत्रणांशी चर्चा केली आहे. पीएमसी बँकेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही आरबीआयने म्हटले आहे.