नवी दिल्ली - कोरोना महामारीने रेल्वेच्या महसुलाला मोठा ब्रेक लागला आहे. देशभरात टाळेबंदीच्या काळात रेल्वे सेवा बंद करण्यात आल्याने रेल्वेचे ३६,९९३ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेच्या उत्पन्नाची माहिती अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान संसदेमध्ये दिली आहे. कोरोनाचा संसर्ग देशभरात वाढवू नये, यासाठी देशातील रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. त्याचा रेल्वेला मोठा फटका बसला आहे. डिसेंबर २०२० अखेर रेल्वेला विविध विभागामध्ये ९३२०१.५४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर डिसेंबर २०१९ मध्ये रेल्वेला विविध विभागांमध्ये १३०१९५.३६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.
हेही वाचा-जाणून घ्या, क्रिप्टोचलनाबाबत इत्यंभूत माहिती
- कोरोना महामारीत टाळेबंदी खुली केल्यानंतर टप्प्याटप्प्याने रेल्वे सुरू केल्या आहेत. देशात १२०६ एक्सप्रेस स्पेशल रेल्वे, २०४ पॅसेंजर रेल्वे आणि ५०१७ उपनगरीय रेल्वे सुरू आहेत. तर अतिरिक्त ६८४ फेस्टिव्हल रेल्वे सुरू आहेत. कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी अद्यापही धोका कायम आहे. त्यामुळे संपूर्ण क्षमतेने रेल्वे सुरू करण्यात आल्या नाहीत. राज्यांच्या मागणीनुसार स्पेशल ट्रेन सुरू ठेवण्यात आल्या आहेत.
हेही वाचा-किरकोळ बाजारपेठेत जानेवारीत महागाईचे प्रमाण कमी; ४.०६ टक्क्यांची नोंद
रेल्वेचे चालू आर्थिक वर्षात डिसेंबर २०२० अखेर ३६,९९३.८२ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. त्यामध्ये ३२,७६८.९७ कोटी रुपयांचे उत्पन्न हे पॅसेंजर रेल्वे बंद असल्याने बुडाले आहे. रेल्वेला किती तोटा झाला, याची माहिती मार्चअखेर समजू शकणार आहे.