नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार रेल्वे मंत्रालयाने १०० दिवसांचा कृती कार्यक्रम निश्चित केला आहे. या नियोजनानुसार दिल्ली-मुंबईसह दिल्ली हावडा या मार्गावरील रेल्वेचा वेग प्रति ताशी १६० किमी करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळेत पाच ते साडेपाच तासांची बचत होणार आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. रेल्वेचा वेग वाढविण्याची प्रक्रिया येत्या चार वर्षात पूर्ण होईल, अशी अधिकाऱ्याने माहिती दिली. सध्या दिल्ली हावडा या मार्गासाठी रेल्वेला १७ तास लागतात. रेल्वेच्या अंमलबजावणीनंतर १२ तास लागणार आहेत. तर दिल्ली-मुंबई मार्गावर रेल्वेला १५ तास लागत असताना हे अंतर १० तासात पूर्ण होणार आहे.
एवढा लागणार निधी-
रेल्वे मंत्रालयाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक समितीची (सीसीईए) मंजुरी घ्यावी लागणार आहे. दिल्ली ते हावडा या १ हजार ५२५ किमीच्या रेल्वे मार्गाच्या अद्ययावतीकरणासाठी सुमारे ६ हजार ६८४ कोटी रुपये लागणार आहेत. तर नवी दिल्ली - मुंबई हा १ हजार ४८३ किमीचा मार्ग आहे. या मार्गाच्या अद्ययावतीकरणासाठी रेल्वेला ६ हजार ८०६ कोटी रुपये लागणार आहेत.
रेल्वेचे खासगीकरण ?
या व्यतिरिक्त रेल्वे मंत्रालयाने १०० दिवसांच्या नियोजनासाठी ११ प्रस्ताव तयार केले आहेत. ज्या रेल्वे मार्गावर कमी वाहतूक आहे, त्या मार्गावर खासगी कंपन्यांना रेल्वे सेवा चालविण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शताब्दी आणि राजधानी या रेल्वेदेखील खासगी कंपन्यांना चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी येत्या चार महिन्यात निविदा काढण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.