रायगड -अलिबागच्या हर्षल जुईकरने आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर केलेले रेल्वे मॉडेल तयार केले आहे. त्यामुळे रेल्वे अपघात टळू शकतील, असे त्याचे म्हणणे आहे. या मॉडेलची दखल घेत गुगलने हर्षलला शिष्यवृत्ती दिली आहे. केंद्र सरकारनेही आत्मनिर्भर योजनेअंतर्गत हर्षलकडून मॉडेल मागविले आहे.
रेल्वे अपघातात अनेकांचा जीव जाऊन संसार उद्ध्वस्त होतात. रेल्वे विभागालाही आर्थिक फटका बसतो. रेल्वे प्रशासनाकडून अपघात टाळण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र तरीही अपघात टाळता येत नाहीत. हे टाळण्यासाठी अलिबागच्या हर्षल मंगेश जुईकर या विद्यार्थ्याने कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता (आर्टिफिशल इंटेलिजन्स) असलेले रेल्वे प्रोजेक्ट मॉडेल तयार केले आहे.
हे आहे तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य-
जगात सिंगल रेल्वे ट्रॅकवर चालविणारी यंत्रणा ही मोनोरेल व बुलेट ट्रेनमध्ये वापरली जात आहे. मात्र मल्टिपल रेल्वेसाठी अशी कोणतीही यंत्रणा अद्यापपर्यंत तयार केली नव्हती. ती हर्षलने विकसित केली आहे. हर्षलच्या या मॉडेलने रेल्वे अपघात टाळणे शक्य होणार आहे.
अलिबाग शहरात राहणारा हर्षल जुईकर हा जे. एस. एम. कॉलेजमध्ये संगणक शास्त्राच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. हर्षलला पहिल्यापासून संगणकामध्ये आवड असल्याने त्याने स्वतः डेटा सर्व्हर बनविले आहेत. भारतात रेल्वे अपघात होत असल्याने अनेकांचे जीव जातात. त्याचा रेल्वेसह अपघातग्रस्त प्रवाशांना आर्थिक फटकाही बसतो. त्यामुळे रेल्वे अपघात टाळता येऊ शकतील का, असा प्रश्न हर्षलच्या मनात आला. त्यानुसार हर्षलने एक सॉफ्टवेअर तयार करण्याचे मनाशी ठरविले. यासाठी महाविद्यालयाच प्राचार्य डॉ. अनिल पाटील, आयटी विभाग प्रमुख प्राध्यापक सुरेंद्र दातार, आयटी शिक्षक सत्यजित तुळपुळे, सचिन भोस्तेकर, चैताली चौधरी, अवती जोगळेकर व आई-वडील यांचे मार्गदर्शन घेतले.