नवी दिल्ली- कोरोनाची लस कधी भारतीयांना उपलब्ध होणार आहे, याचे उत्तर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एसआयआय) मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पुनावाला यांनी दिले आहे. कोरोनाची लस प्रत्येक भारतीयाला २०२४ पर्यंत मिळेल, असे अदार पुनावाला यांनी सांगितले. ते एका माध्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
अदार पुनावाला म्हणाले, की ऑक्सफोर्ड अॅस्ट्राझेनेका ही कोरोनावरील लस सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि ज्येष्ठांना फेब्रुवारी २०२१ मध्ये मिळेल. त्यानंतर एप्रिलमध्ये सर्वसामान्यांना लस मिळेल. कोरोना लसीच्या दोन डोसची किंमत जास्तीत जास्त १ हजार रुपये असणार आहे. कोरोनाची लस २०२४ पर्यंत देशातील सर्वांना मिळेल.
कोरोनाची लस देशातील सर्वांना मिळण्यासाठी दोन ते तीन वर्षे लागण्याची शक्यता आहे. फक्त पुरवठाच नव्हे तर बजेट, लॉजिस्टिक्स, पायाभूत सुविधा या कारणाने लस प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागणार आहे. भारत सरकारला ही लस ३ ते ४ डॉलरला मिळणार आहे. कारण, भारत मोठ्या प्रमाणात लस खरेदी करणार आहे. कोरोनाच्या इतर लसीहून आमच्या लसीची किंमत कमी असेल, असेही पुनावाला यांनी सांगितले.
सिरमसह आयीसीएमआर घेणार कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याची चाचणी-
सिरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) आणि आयसीएमआरने लसीच्या तिसऱ्या टप्प्याची चाचणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. या चाचणीसाठी देशातील १,६०० स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे. सिरम आणि आयसीएमआर या दोन्ही संस्था संयुक्तपणे कोरोनावरील लसीच्या वैद्यकीय चाचण्या देशात घेणार आहेत. चाचणीचा खर्च सरकारी संस्था असलेली आयसीएमआर करत आहे. तर कोव्हिशिल्ड लसीवरील इतर खर्च हा सिरमकडून केला जात आहे. एसआयआय आणि आयसीएममारकडून दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या देशातील १५ विविध केंद्रांवर घेण्यात येत आहे. त्यासाठी लागणाऱ्या १,६०० स्वयंसेवकांची नोंदणी ३१ ऑक्टोबरला करण्यात आली आहे.