नवी दिल्ली- व्हॉट्सअॅपचा दहशतवादी आणि समाजकंटकांकडून वापर होत आहे. याबाबत कार्यवाही करण्याची सूचना केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्हॉट्सअॅपचे जागतिक प्रमुख विल कॅथकार्ट यांना केली आहे. संदेश मूळ कोणी पाठविला आहे, हे शोधून काढणारी यंत्रणा व्हॉट्सअॅपने विकसित करावी, अशी सरकारने सूचना केली आहे.
व्हॉट्सअॅपचे ग्लोबल हेड विल कॅथकार्ट यांनी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री प्रसाद यांची भेट घेतली आहे. या भेटीची माहिती देताना प्रसाद यांनी सांगितले, की मेसेजचे स्त्रोत शोधून देणे त्यांचे काम आहे. व्हॉट्सअॅप हे माध्यम समाजकंटक, दहशतवादी आणि जहालवादी लोकांकडून वारंवार वापरण्यात येते. त्यासंदर्भात स्त्रोत कोणते आहे, हे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने माहित असणे आवश्यक आहे. याबाबत व्हॉट्सअॅपच्या सीईओंनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. देशाची सुरक्षा महत्त्वाची असल्याची गरज प्रसाद यांनी अधोरेखित केली.
व्हॉट्सअॅपने तक्रार निवारण अधिकारी म्हणून भारतीयाची नियुक्ती करावी, अशीही प्रसाद यांनी व्हॉट्सअॅपच्या ग्लोबल हेडकडे विचारणा केली आहे. सध्या व्हॉट्सअॅपने भारताबाहेरील अधिकाऱ्याची तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सरकारच्या मागणीप्रमाणे व्हॉट्सअॅपने देशात कार्यालय सुरू केल्याचेही प्रसाद यांनी सांगितले.