नवी दिल्ली - जेट इंधन आणि नैसर्गिक वायूचा वस्तू व सेवा करांमध्ये (जीएसटी) समावेश होण्याची शक्यता आहे. याबाबतचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून घेतला जाईल, अशी अपेक्षा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केली.
केंद्र सरकारने एक देश, एक कर प्रणाली असलेल्या जीएसटीची १ जूलै २०१७ पासून अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. मात्र, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाला जीएसटीच्या करप्रणालीमधून वगळण्यात आले.
केंद्रीय अर्थमंत्री विमान इंधनासह नैसर्गिक वायूचा जीएसटीमध्ये समावेश करतील, अशी अपेक्षा धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केली. ते फिक्कीच्या कार्यक्रमात बोलत होते. केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन या आर्थिक वर्ष २०२०-२१ चा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर करणार आहेत. जीएसटीच्या कररचनेत बदल करण्याचे जीएसटी समितीला संपूर्ण अधिकार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या जीएसटी समितीच्या अध्यक्षा आहेत. तर देशातील राज्यांचे अर्थमंत्री हे समितीचे सदस्य आहेत.
हेही वाचा-अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मदत करावी - सुनील तटकरे